भोरः भोर विधानसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भोर विधानसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीनाम्यात अद्यावत आरोग्य सुविधा, रस्त्यांची समस्या, शेती व शेतकरी आणि एमआयडीसीचा प्रश्न आदी गोष्टींवर भर देण्यात आला आहे. या मेळावाच्या माध्यमातून मांडेकर यांनी मला उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज झाले होते, नाराजांची मनधरणी केली असून, आता कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच तुम्ही सगळ्या मोठ्या मनाने मला स्विकारले असल्याने सर्वांचे आभार मांडेकर यांनी मानले.
खरंतर विधानसभेसाठी तयारीला सुरूवात केली होती. त्यावेळी मी दादांना भेटलो होतो आणि त्यांना मी इच्छुक असल्याचे सांगितले होते. दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली, त्या संधीचे सोनं करेन असे विश्वास मांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. मला उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक इच्छुक नाराज झाले होते. त्या साहजिकच आहे, कारण आपण एखाद्या संघटनेत अनेक वर्ष काम करताना आपल्याना संधी मिळावी, ही प्रत्येकाची इच्छा असते त्यात काही चुकीचे नाही, असे मांडेकर म्हणाले.
भोरवासियांनी मला मोठ्या मनाने स्विकारले आहे, मी एक हाडाचा कार्यकर्ता आहे. काम करताना संघटनेतल्या कोणत्याच कार्यकर्त्याला कधी दुखवत नाही. भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी या भागात फिरत असताना सगळ्यांना एकच गोष्टी हवी आहे, ती म्हणजे बदल. पण बदल घडण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. बदल घडणवणार कोण, यापेक्षा बदल हा महत्वाचा आहे, ही एक संधी आहे, आपण सर्वजण एकत्र आलो, तर बदल हा नक्कीच घडेल, असा विश्वास मांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढच्या वेळी जुन्या लोकांना घेऊन तुमच्यासमोर येईलः मांडेकर
विद्यमान आमदार निधी दिला जात नाही म्हणून सांगतात. भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी भागांना भेटी दिल्यावर प्रत्येक ठिकाणी वेगळे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या लोकांना घेऊन तुमच्यासमोर येईल अशी ग्वाही मांडेकर यांनी यावेळी दिली. अनेक वर्षांची सत्ता घालवून तुमच्या विचारांची सत्ता आणून या भागातील विकास कामे हे सोडविण्यासाठी आणि या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.