१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा
भोर – राज्य शासनाच्या महसूल विभागाने आयोजित केलेल्या ऑगस्ट या महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात नागरिकांच्या विविध प्रश्नांवर विशेष भर देऊन त्यावर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
भोर उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवार ( दि. ३१) रोजी आयोजित पञकार परिषदेत डॉ. खरात यांनी सांगितले .
यावेळी तहसिलदार राजेंद्र नजन , नायब तहसिलदार डॉ अरुण कदम , वैशाली घोरपडे , संजय गांधी नायब तहसिलदार प्रतिभा खाडे , आदेश दुनाके, मंदार नेरेकर सर्व मंडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डाँ. खरात म्हणाले की १ ते ७ आँगस्ट पर्यंत हे महसूल च्या विविध विभागानुसार कार्यक्रम पार पडले जाणार आहेत. या महसूल दिनामध्ये सर्व विभागातील शासकीय अधिकारी ,आमदार , माजी आमदार , पंचायत समिती सदस्य , जि. प. सदस्य , सरपंच , उपसरपंच , सोसायटीचे चेअरमन , व्हा. चेअरमन , पक्षाचे पदाधिकारी यांना निमंत्रण केले जाणार आहे.
तहसिलदार राजेंद्र नजन सांगितले की या महसूल सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी “महसूल संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करुन पात्र असलेल्या कुटुंबांना जागांचे पट्टे वाटप केले जाणार आहे.
तिसऱ्या दिवशी गावातील असणारे पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम केला जाणार आहे.
चौथ्या दिवशी मंडलनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवले जाणार असून त्यामध्ये नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जाणार आहेत.
पाचव्या दिवशी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप केले जाणार आहेत.
सहाव्या दिवशी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेण्यात येणार आहे.
सातव्या दिवशी “M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेऊन महसूल सप्ताहाची सांगता केली जाणार आहे असे सदर तहसीलदार राजेंद्र नजन व प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी सांगितले