भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर :तालुक्यातील आंबवडे येथे पंचक्रोशीतील पंचवीस गावांचा संपर्क असणारी बँक ऑफ महाराष्ट्र एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. अतिशय दुर्गम व डोंगरी भागातून गेले ३५ वर्षे बँकेत ६० हजारहून अधिक खातेदारांना सेवा देणारी बँक हस्तांतरण होत असल्या प्रकरणी खातेदारांनी तसेच नागरिकांनी बँक प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन गुरुवार दिं.१२ केले. बँकेत महिला बचत गट, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक शेतकरी, शेती कर्ज, पगारदार, सोनेतारण व विविध कर्जदार यांचा खातेदार म्हणून समावेश आहें. आंबवडे शाखा भोर शाखेमध्ये विलीनीकरण झाल्यास खातेदारांना २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार असून तेथील असणारी गर्दी, आबालवृद्ध खातेदारांचे हाल होणार आहेत.
गर्दीमुळे असुरक्षितता तसेच वेळ व आर्थिक हानी सहन करावी लागणार आहें. आंबवडे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे विलीनीकरण भोर शाखेत होऊ नये अशी मागणी करीत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या प्रांगणात पंचक्रोशीतील खातेदारांनी ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठांच्या मनमानी कारभारामुळे बँकेचे स्थलांतर केले तर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे बँकेच्या खातेदारांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच रोहिदास जेधे, सुंदरदास खोपडे, मोहन जेधे, राजीव केळकर, नितीन जेधे, जितेंद्र खोपडे, किशोर शेडगे, महेंद्र देवघरे, मोहन भडाळे, स्वप्नील भडाळे, दिलीप देवघरे, ज्ञानेश्वर नवघणे, सारिका जेधे, जयश्री जेधे, सुवर्णा जेधे, स्वाती जेधे, प्रीतम जेधे, साधना खोपडे, गणेश भडाळे, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच,विद्यार्थी, बचत गटाच्या सभासद,असंख्य बँक खातेदार उपस्थित होते.