महिला सरपंच निलम झांजले यांचा विशेष उपक्रम
भोर पासून काही अंतरावर असलेले बसरापुर हे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. येथील गावातील महिलांनी दरवर्षी प्रमाणे सादर होणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमात आपले गाव “प्लास्टिक कचरा मुक्त गाव”करण्याचा निर्धार करत एकमेकिंना सुवासिनीचे लेण देत हळदी कुंकू साजरे केले. यावेळी या गावच्या विद्यमान महिला सरपंच निलम झांजले व महिला ग्रामसेविका मेघा गावडे यांनी विशेष पुढाकार घेत महिलांना प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आवाहन केले. साळवडे येथील ग्रामसेवक श्री.निकम हे या कार्यक्रमावेळी उपस्थित रहात त्यांनी प्लास्टिकने होणारे नुकसान,होणारे प्रदुषण व त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम याची माहिती दिली तसेच आपल्या गावात प्लास्टिक कचरा कसा गोळा करून त्याचे व्यवस्थापन,विघटन कसे केले जाते ते सांगितले.
या कार्यक्रमाला गावचे उपसरपंच रामदास झांजले, माजी सरपंच रमेश झांजले, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले, सामाजिक कार्यकर्ते मोहन बदक, विष्णु पवार, माजी उपसरपंच शारदा झांजले, अंगणवाडी सेविका अनिता झांजले,ग्रा.प.सदस्या शोभा झांजले, राजश्री साळुंके, शोभा कुंभारकर, सविता झांजले, शिपाई अनुराधा कुंभारकर अशा गावातील असंख्य महिला, तरुणी उपस्थित होत्या. दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामपंचायतीमार्फत गावातील महिलांना विशेष भेट वस्तू देण्यात आली.
गाव प्लास्टिक कचरा मुक्त झाल्याने आणखी स्वच्छ दिसणार असून प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी टळणार आहे असल्याचे सरपंच निलम झांजले यांनी सांगितले.