बारामतीः सध्या अगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्षांमध्ये उमेदवारासंदर्भात घमासान सुरू असून, त्या दृष्टीने आखणी करण्यात येत आहे. बारामती विधानसभा ही देखील त्याला अपवाद नाही. ज्या बारामतीमधून अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा उदय झाला, तिथून माझी निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचे अजित पवार यांनी बोलून दाखविले होते. त्यातच जय पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बारामती येथील पेन्सिल चौकात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देता त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील, तो निर्णय मान्य असेल असे म्हणत अजित पवारांवर निर्णय सोपविला आहे. यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार कोणता निर्णय घेतील हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा होत असून, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून फिक्स आमदार अशा आशयाचे बॅनर देखील शहरात झळकविण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात शरद पवार गट युगेंद्र पवार यांचे नाव फायनल करणार की, ऐनवेळी दुसऱ्या कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.