शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख
गणेशोत्सव सुरु होत असून गणेशोत्सवातून सामाजिक व समाजपयोगी उपक्रम राबवून गणेशोत्सव शांततेत व सामाजिक सलोख्याने साजरा करा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (prashant dhole) यांनी केले आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथे गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन व २०२३ च्या ‘गणराया अवार्ड’ चषक वितरण प्रसंगी प्रशांत ढोले हे बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, गणेशोत्सव काळात धार्मिक स्थळांच्या ठिकाणी शांतता राखा, विसर्जन मार्ग तपासा, मिरवणुका वेळेत व शांततेत पूर्ण करा यांसह त्यांनी केल्या. तर २०२३ मध्ये आदर्श उपक्रम राबवणाऱ्या शिक्रापूर येथील बाबू गेनू गणेशोत्सव मंडळला प्रथम क्रमांक, जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ कोरेगाव भीमा द्वितीय क्रमांक, अमरज्योत मित्र मंडळ तळेगाव ढमढेरे यांना तृतीय क्रमांकाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर यावेळी बोलताना गणेशोत्सवातील अनाठायी खर्च टाळून गावामध्ये सीसीटीव्ही बसवावे जेणेकरून गावचे २४ तास संरक्षण होईन, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, माधुरी झेंडगे, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, संदीप ढेरंगे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंदन सोंडेकर, विश्वास ढमढेरे, शिवसेना अध्यक्ष कैलास नरके, बाळासाहेब लांडे, शिक्रापूर तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष गोरक्ष सासवडे यांसह आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी केले. तर प्रास्ताविक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले यांनी केले आणि उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी आभार मानले.