नवी मुंबई: महागाई रोखण्यामध्ये केंद्र व राज्यसरकार पूर्णपणे असफल ठरलेले आहे, एकीकडे महिलांसाठी तात्पुरती योजना आणून मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आपल्यासमोर आवासून उभा आहे. त्यावर ते बोलायला तयार नाहीत. लोकसभेच्या निकालानंत्तर आता यांना बहीण आठवली, दुसरीकडे महागाई करून जनतेची वसूली करण्याचे काम खोके सरकार करीत आहे. यासाठी अनेक प्रलोभने महिला व मतदार बंधूना दाखविली जात असल्याचा घणाघात भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी केला. ते नवी मुंबई येथील गणेश सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. भोर राजगड (वेल्हा)मुळशी तालुक्यातील मुंबई व नवी मुंबई रहिवासी सेवा संघाच्या वतीने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील गणेश सभागृह मध्ये संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मा. मंत्री विधानपरिषद सदस्य आ. शशिकांत शिंदे, मानसिंगबाबा धुमाळ, माऊली शिंदे, रविंद्र बांदल, शैलेश सोनवणे, गणेश शिंदे, विठ्ठल आवाळे, नितीन दामगुडे, हनुमंत कंक, रामदास जेधे, संभाजी मांगडे, अनिल सावले, आंनदा आंबवले, सोनबा जाधव, बाळासाहेब खोपडे, दत्तात्रय तनपुरे, सोपान कंक, तुकाराम धोंडे, पांडुरंग धोंडे, रविंद्र चव्हाण, काळुराम मळेकर, विठ्ठल मळेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
मतदार संघातील स्वाभिमानी व सुज्ञ असलेली जनता कधीही याला बळी पडणार नाही. एमआडीसी आणि अन्य विषयांवर गैरसमज पसरवला जात असून तरुणवर्गाची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करीत असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना थोपटे म्हणाले, आपल्या स्वार्थासाठी पक्ष फोडणारे, पक्ष बदलणारे, तिकीट मिळविण्यासाठी इकडून तिकडे उड्या मारणारे आमच्यावर टीका करून मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या मंडळींना पक्षाचे तिकीट मिळवीता आले नाही. त्यांच्या जनमतावर वरिष्ठांचा विश्वास नाही. आयात उमेदवाराला ऐनवेळी उमेदवारी द्यावी लागली.
भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी तालुक्यात विकास कामे केली आहेत. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांना दिलेले प्रचंड मताधिक्य या विश्वासावर विधानसभेला आपण सर्वजण सोबत असून, माझे हात बळकट करून मला पुन्हा काम करण्याची संधी देणार असा विश्वास थोपटे यांनी यावेळी व्यक्त केला.