भोरः राज्यातील २८८ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दि. २९ अॅाक्टोबर ही शेवटची तारीख होती, तर आलेल्या अर्जांची छाननी आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी पार पडली आहे. या अर्जांची छाननीच्या प्रक्रियेबाबत भोर विधानसभा मतदार संघात प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी अर्जदार भाऊ पांडुरंग मरगळे यांनी संग्राम अनंतराव थोपटे यांच्या नामनिर्देशन अर्जावर लेखी हरकत तक्रार दाखल केली होती. मात्र, अपक्ष उमेदवाराचा हरकत अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लगावला आहे. यामुळे स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत असल्याची हरकत घेण्यात आली होती.
त्यामुळे हरकत फेटाळून लगावली
या हरकत तक्रारी अर्जात संग्राम थोपटे यांनी मुलाची संपत्ती लपवली असून आंबेघर (ता.भोर) येथील खडी मशीन बाबतची माहिती दिलेली नाही. तसेच अर्जात खोटी व अर्धवट माहिती सादर केली आहे, असे म्हटले आहे. यामुळे माहिती लपवल्या प्रकरणी उमेदवारी अर्ज रद्द करावा, असे या हरकतीवर नमूद करण्यात आले होते. यावर संग्राम थोपटे यांचे अधिकृत प्रतिनिधी अशोक विठ्ठल थोपटे यांनी लेखी म्हणणे सादर करीत पृथ्वीराज संग्राम थोपटे यांची मिळकत आंबेघर (ता.भोर) खडीमशीन व्यवसाय स्वतंत्र आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या प्रतिज्ञा पत्रावर तसे लिहिणे बंधनकारक नाही. त्यामुळे ज्यांनी हरकत घेतली आहे त्यामध्ये तथ्य नाही त्यांचा अर्ज पात्र ठरविण्यात यावा असे अशोक थोपटे यांनी लेखी निवदेनात सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.
यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरत देत यामध्ये सदर प्रतिज्ञापत्रात संबंधित उमेदवाराने लपवलेली माहिती त्याची तपासणी करणे वा शहानिशा करणे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिकार किंवा कार्यक्षेत्रात येत नाही. संग्राम थोपटे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत प्रतिज्ञा पत्रातील सर्व रकाने भरलेले आहेत. या कारणावरून हरकत तक्रारी अर्ज फेटाळले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात यांनी सांगितले. तसेच आवश्यक असल्यास त्यांनी कार्यालयात शपथपत्र सादर करावे असे आदेश देत म्हटले आहे.
मी भरलेला अर्ज निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेला आहेः संग्राम थोपटे
अर्ज दाखल करताना तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागते. त्यानुसार माझ्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांची माहिती मी माझ्या फार्ममध्ये दिलेली आहे. माझा मुलगा हा सज्ञान आहे, त्याचे वय १८ पेक्षा अधिक आहे. त्याचा स्वतंत्र व्यवसाय असल्यामुळे त्याची माहिती देण्याची मला गरज नव्हती. यावर त्यांनी हरकत घेतली आणि सांंगितले ही माहिती दिली नाही. मी भरलेला अर्ज योग्य असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तो ग्राह्य धरलेला आहे.