बारामतीः जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका इनोव्हा कंपनीच्या गाडीतून आलेल्या सहा जणांनी जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून १७ वर्षीय मुलाची धारधार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मयत झालेल्या १७ वर्षीय मुलाचे नाव गणेश धुळाबापू वाघमोडे असे असून, या प्रकरणी नवनाथ उत्तम चोरमले (वय 39 वर्षे, धंदा फोटो ग्राफर रा. अहिल्यादेवी चौक जळोची बारामती ता. बारामती जि. पुणे) यांनी बारामतीत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. जयेश बाळासाहेब माने, शुभम गायकवाड, करण जाधव, अविष गरुड, सोमनाथ जाधव, भोल्या व इतर सर्व राहणार बारामती अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत.
मयत गणेश धुळाबापू वाघमोडे याची आणि आरोपींची गेल्या वर्षी येथील एका नामांकित महाविद्यालयात भांडण झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन त्याला जीवे मारण्याचा कट रचून त्याचा खून केला असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ इनोव्हा कंपनीच्या गाडीमधून सहा जण उतरले आणि गणेश वाघमोडे याच्या डोक्यात, मानेवर व इतर ठिकाणी धारधार शस्त्राने सपासप वार केले. या घटनेत गणेश वाघमोडे याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मस्कर हे करीत आहेत.