खेड-शिवापूरः पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाच्या बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जीप गाडी धडकून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी असून, इतर दोन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्यावेळी काही जण मांढरदेवी येथून दर्शन करून पुण्याच्या दिशेने मोटारगाडीने निघाले होते. येथील उड्डाणपुलाचे काम सुरु असून, वाहतूक वळणाजवळ असलेल्या मधल्या दुभाजकाला लागून मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे. त्याला धडकून ही जीपगाडी हवेत उडून उलटली असे त्यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
या गाडीत एकूण सात जण होते. त्यातील एक जण गंभीर जखमी, तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. अपघातावेळी येथे असणाऱ्या पेट्रोल पंपातील कामगार आणि स्थानिक नागरिकांनी जीपमधील प्रवाशांना बाहेर काढून, जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
खबरदारी न घेतल्याने अपघात
येथील उड्डानपुलाचे काम सुरू असून, काम करणाऱ्या ठेकेदाराने वाहतूक वळण असल्याने येथे रिफ्लेक्टर, दिवे, फलक लावणे आवश्यक होते. मात्र, अशी कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यामुळे एखादी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
एका तासांनंतर पोलीस घटनास्थळी दाखल
महामार्गावरील प्रवाशांच्या सुखरूप आणि सुरक्षित प्रवासासाठी दक्ष हे महामार्ग पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. शिवरे येथील अपघात झाला. या अपघातातील प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले. तर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी दक्ष असलेले महामार्ग पोलीस आणि राजगड वाहतूक विभाग घटनास्थळी आले नव्हते. अपघाताघडून एका तासानंतर महामार्ग पोलीस अपघातस्थळी आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.