पुरंदर: पुरंदर विधानसभेसाठी युती व आघाडी यांच्याकडून अद्यापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, युतीकडून अनेकजण आमदारकी लढविण्यास इच्छूक आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार संजय जगताप की मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याविषयी मुंबईत खलबंत सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये निवडणूकीच्या रिंगणात अनेकजण रांगेत आहेत. यामुळे महायुतीकडून तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे, अजित पवार गटाकडून डॅा. दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर भाजपमध्ये मा. आमदार अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे, जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, पंडित मोडक हे देखील इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या वतीने सासवडला एका पत्रकार परिषदेत १९ अॅाक्टोबर रोजी मेळावा घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या मेळाव्यात महायुतीच्या वतीने भाजपला संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी दिली. या पत्रकार परिषदेला मा. आमदार अशोक टेकवडे, पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, सासवड अध्यक्ष संतोष जगताप, हवेलीतून पंडित मोडक, संदीप जगदाळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरंदर तालुका पारंपारिक भाजपकडे असून तालुक्यात पक्षाची मोठी ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीमधून भाजपला उमेदवारी मागितली जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी दिली. यामुळे आता महायुतीमधील भाजपकडून या जागेवर दावा करण्यात येणार असल्याने ही जागा कोणाला सुटते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.