पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे
भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा पालखी सोहळा तब्बल सोळा तास रंगला होता. यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पालखी सोहळा गडावर विसावल्यानंतर चित्तवेधक अशा महाखंडा तलवार स्पर्धा पार पडल्या.
यात दाताने तलवार उचलून धरणे, एका हाताने तलवार तोलून धरणे अशा कसरती पार पडल्या. ग्रामस्थ, मानकरी, खान्देकरी आणि गुरव पुजारी मंडळींनी पालखी सोहळा नेहमीप्रमाणे निर्विघ्नपणे पार पाडला. देवसंस्थान कमिटीने व्यवस्थापन पाहिले. सुमारे सोळा तास सोहळा चांगलाच रंगला होता.
या चित्तथरारक अशा कसरतीत सचिन कुदळे, बापू राऊत, नितीन कुदळे, शिवाजी राणे, विशाल माने, शुभम कुदळे, मयूर केंजळे आदींनी भाग घेतला होता. तर खंडा तोलून धरणे यात सुहास खोमणे, अंकुश गोडसे, मंगेश चव्हाण, अमोल खोमणे, हेमंत माने यांनी भाग घेतला होता. सर्वांना योग्य पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण मा. ट्रस्टी सुधीर गोडसे, किसन कुदळे आणि जालिंदर खोमणे यांनी केले. रविवारची संपूर्ण रात्र आकर्षक फाटक्यांची अतिशबाजी झाली. यामुळे संपूर्ण जयाद्री खोरे प्रकाशमान झाले होते.