जेजुरीः आजपासून शारदायी नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीतील मल्हारगडावर देखील नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. गडावर घटस्थापना करण्यात आली असून, गडाला आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई जेजुरीकर आणि भाविक भक्तांचे लक्ष विधून घेत आहे. या काळात गडावर विविध प्रकारचे धार्मिक विधी पार पडतात. तसेच या काळामध्ये गडावर अनेक भाविक भक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी दाखल होतात.
नऊ दिवसानंतर विजयादिशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी गडावरून देवाचा पालखी सोहळा काढण्यात येतो. प्रदीर्घ वेळ चालणाऱ्या या पालखी सोहळ्यास मर्दानी दसरा असे संबोधली जाते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गडावर चालणाऱ्या खंडा स्पर्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. गडावर या स्पर्धेत सहभागी असलेल्यांचा सराव करण्यात येत आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी प्रमाणावर भाविक भक्त आणि जेजुरीकर गडावर दाखल होत असतात.