इंदापूरः आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांकडून राज्यातील मतदार संघावर दावा केला जात आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी देखील इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत आहे. इंदापूरच्या जागेबाबत ही जागा कोणाला मिळणार यावर अनेक मतमतांतरे झडताना दिसत आहेत. अशातच मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पाटील हे तालुक्यातील विविध गावांचा दौरा करुन नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच ते विधानसभा इंदापूर येथून लढणार असे जवळपास फायनल झाले असल्याचे बाेलले जात असून, कोणत्या पक्षातून निवडणूक लढविली जाणार हे मात्र गुलदस्त्यामध्ये आहे. येथील एका गावात आयोजित सभेत पितृपंधरवड्यानंतर याविषयीचा निर्णय आपण जाहीर करणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत.
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा देखील होताना दिसत आहे. तशा पोस्ट त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात येत आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय आपण पितृपंधरवड्यानंतर जाहीर करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीचा विचार करता या मतदार संघातून दादा गटाचे दत्तामामा भरणे हे आमदार आहेत. दादा गटाकडून या जागेवर दावा या आधीच करण्यात आला आहे. यामुळे महायुतीकडून अर्थात भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला असून यावर महायुतीमधील बड्डे नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
कार्यकर्त्यांची इच्छा
मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकावी किंवा अपक्ष निवडणुकीला सामोरे जावे अशी कार्यकर्त्यांची मागणी असून, त्या संदर्भात पाटील यांना कार्यर्त्यांनी सांगितलेले आहे. मात्र, पाटील यावर काय निर्णय घेणार हे पाहणं लागणार आहे.