नसरापूरः गेल्या काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या एका गावात दोन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणामुळे संतापाची धग अजूनही पेटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ वरवे गावातील महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावासह दुकाने बंद ठेऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे.
सकाळी गावातील सर्व जेष्ठ मंडळी, तरुण वर्ग महिला आणि युवती मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाल्याचे पाहिला मिळाले. यानंतर महिला व ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे एकत्रित येत अभिवादन केले. संपूर्ण गावातून महिला व युवतींनी निषेध रॅली काढून अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी बदलापूरच्या धर्तीवर आरोपीला शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ, महिला तरुणींच्या वतीने करण्यात आली.
येथून पुढे अनोळखी व्यक्तीला गावात थारा नाही
गावात भाडोत्री राहत असलेल्या बाहेरील व्यक्तींकडून अशी घटना घडल्याने नाहक गाव बदनाम होत आहे. येथून पुढे बाहेरील व्यक्तीची सर्व माहिती असल्याशिवाय त्याला गावात थारा देऊ नये, अशी मागणी यावेळी महिलांच्या वतीने करण्यात आली.
आरोपीला फाशीच द्या
माणुसकीला काळिमा फासणारी आणि अतिशय निंदनीय घटना घडली आहे. यामुळे परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिडीतेला न्याय मिळाला पाहिजे तसेच या घटनेतील आरोपीला अल्पवयीन न समजता त्याला इतर आरोपीप्रमाणे फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी बोलताना महिलांनी केली.
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, महिलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
या घटनेतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार करून पिडीत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याला अज्ञान न समजता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वरवे गावातील महिलांनी लिहिले आहे.