मुंबई: भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने 23 सप्टेंबरला संवाद यात्रेचा समारोप येथील गोवंडीमध्ये पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील 5000 पेक्षा अधिक भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते. भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीने २८ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संवादयात्रेला सुरूवात केली होती. त्याची सांगता येथे झाली.
कलेचे सादरीकरण
मुंबई येथील आरबीके मैदानावर राज्यातील सर्व जिल्ह्यातून हजारो भटके विमुक्त आदिवासी बांधव, ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक, संसाधने याचा विचार न करता आपले हक्क, अधिकार व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. सकाळच्या सत्रात भटके विमुक्त समाजातील गारूडी, गोंधळी, किंगरीवाले, कडकलक्ष्मी, जादुगार, वासुदेव, पोतराज, किन्नर, आराधी समुहातील कलाकारांनी आपली कला, गीते व कौशल्य सादर केले. त्यांच्या या कलेला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
अनुभवाचे कथन
त्यानंतर भटके विमुक्त आदिवासी समुहातील मान्यवरांनी आपापले मनोगत सादर केले. तर राज्यव्यापी संवादयात्रेत सहभागी झालेल्या भावना वाघमारे, बाबुसिंग पवार, संतोष जाधव यांनी आपला अनुभव सांगितला. पहिल्या सत्रामध्ये उमाताई जाधव,मुनीर शिकलगार, संतोष चव्हाण व देवीदास हादवे यांनी सुत्रसंचलन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये समाजशास्त्र अभ्यासक डॉ. अंजली मायदेव, मानव हक्क आयोगाचे सचिव नितीन पाटील, भटके विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड, मकबूल वलांडीकर, अब्दुल रज्जाक शेख, शिवदास शिंदे, सुंदरसिंग चव्हाण हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
शिक्षणमंत्र्यांकडून मागण्याचे आश्वासन
मुख्यमंत्री कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या अॅड. अरुण जाधव, मुमताज शेख व शैला यादव यांनी आपली भूमिका व मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चेचा अहवाल यावेळी सादर केला. शिक्षणमंत्री डॉ. दिपक केसरकर यांनी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतची बैठक दोन दिवसांत बोलवून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
भटके विमुक्त आदिवासी समाजाचे दु:ख, वेदना वनवास, मंत्रालयाच्या वेशीला टांगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, जनगणना नागरिकत्वाची पुरावे, स्वतंत्र बजेट, सुरक्षा या वेदनेचे गाठोडे घेऊन राज्यातील सर्वदूरहून हजारो भटके विमुक्त आदिवासी बांधव मोठ्या विश्वासाने व उत्सुकतेने मुंबईत दाखल झाले होते. गेल्या ७७ वर्षांतील वनवास संपवण्यासाठी भटके विमुक्तांनी कंबर कसली असून, आता थांबायचे नाही, या निर्धाराने भटके विमुक्त आदिवासी राज्यव्यापी संवादयात्रेचा समारोप करण्यात आला.