मुंबईः धारावीमध्ये धावत्या बेस्टमध्ये प्रवेश करुन एका चोराने बसच्या वाहकाकडील पैशांची बॅग हसकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा प्रतिकार या वाहकाने केल्याने त्याच्यावर चोराने चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपी शाहबाज खानला अटक केली आहे. ही संपूर्ण घटना गुरुवारी विक्रोरी आगार ते पायधुनी मार्गावर धावणाऱ्या बेस्ट बस क्रमांक ७ मध्ये धारावी येथील पिवळा बंगला परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये बेस्टच्या धावत्या बसमध्ये शिरून चोराने वाहकाकडून पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. इतकच नाही तर वाहकाने चोराचा प्रतिकार करताच चोराने त्याच्यांवर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा मोबाइल घेऊन तो चोर पसार झाला. याबाबतची माहिती धारावी पोलिसांना मिळताच धारावी पोलिसांनी काही तासांमध्ये आरोपी शाहबाज खानच्या मुसक्या आवळल्या असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले वाहक अशोक डगळे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पैशांची बॅग हिसकावत केले चाकूने वार
धारावी येथील पिवळा बंगला परिसरात गुरुवारी रात्री बेस्ट बस धावत होती. यावेळी शाहबाज हा बसमध्ये शिरला. प्रवासी असल्याचा समज झाल्याने वाहक अशोक डगळे हे बेसावध होते. शाहबाज याने बसमध्ये प्रवेश करताच डगळे यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावण्यास त्याने सुरुवात केली. डगळे यांनी प्रतिकार करताच शाहबाजने चाकू काढला आणि चाकूने त्यांच्या एकमागून सपासप वार केले. या हल्ल्यात डगळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोराने त्यांच्याकडील मोबाइल हिसकावला आणि तो मोबाईल घेऊन तिथून पसार झाला. त्यानंतर चालकाने याबाबतची माहिती पोलिसांना कळवत डगळे यांना रुग्णालयात दाखल केले.
काही तासांमध्ये पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
वरिष्ठ निरीक्षक राजू बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे उपनिरीक्षक विकास शेलार यांच्यासह दत्तात्रय वरखडे, राजेश शिंगटे, बजरंग लांडगे, योगेश सोनार यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. या पथकाने तपास कौशल्य पणाला लावत हल्ला करणारा आरोपी शाहबाज खान असल्याची ओळख पटवली. डगळे यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. धारावीतील कावळे परिसरात आरोपी असल्याची माहिती धारावी पोलिसांना मिळताच त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाइल आणि चाकू हस्तगत केला आहे.