भोरः बारामती लोकसभेचा भाग असणारा आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ४३ हजार मतांचे लीड मिळवून देणारा मतदार संघ म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव म्हणून भोरची ओळख संबंध राज्यात आहे. याच विधानसभा क्षेत्रात वेल्हा म्हणजेच नव्याने ओळखला जाणारा राजगड आणि मुळशी या दोन तालुक्यांचा सहभाग आहे.
भरभरुन निसर्गाचे सानिध्य या तीन तालुक्यांना लाभलेले आहे. येथील नागरिकांची नाळ शेतीशी जोडलेली आहे. अनेक डोंगरदऱ्या आणि दुर्गम भाग याचा ठिकाणी पाहला मिळतात. असे असताना सातत्याने पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या प्रमाणात भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यांचा विकास रखडलेला आहे, असे बोलले जाते. परंतु, अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे प्राबल्य या मतदारसंघावर राहिलेले आहे. तब्बल तीन टर्म विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधत्व विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इथला मतदारराजा कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सध्या तरी विद्यमान आमदार संग्राम थोपटे हेच पुन्हा एकदा भोर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता दिसत आहे.
जरा काही काळ मागे गेल्यावर सध्याची राजकीय परस्थिती लक्षात येईल. वर्ष होतं 1999. त्यावेळी भोर वेल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळपास फायनल होत्, परंतु ऐनवेळी काही प्रबळ राजकीय व्यक्तींनी अनंतराव थोपटे यांना पराभूत केले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. 2009 मध्ये संग्राम थोपटे हे पहिल्यांदा आमदार झाले. मंत्री मंडळात त्यांचा समावेश होणार तोच काही गोष्टींमुळे ते मंत्रीपदापासून अलिप्त राहिले. त्यानंतर 2014 मध्ये संग्राम थोपटे हे दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा उदय देशात आणि पर्यायाने राज्यात देखील झाल्याने त्यावेळी देखील मंत्रीपदाची संधी हुकली. 2019 मध्ये पुन्हा एकदा संधी मिळणार तोच राजकीय परिस्थिती बदलली. असा एकूण काही राजकीय परिस्थिती या काळामध्ये निर्माण झाली होती. असे असले तरी येथील जनता थोपटे परिवारासोबत आजही खंबीरपणे त्यांना साथ देत आहे, असे काही जाणकरांकडून सांगण्यात आले आहे.
ज्यावेळी कित्येक लाखांच्या मतदारसंघातून आमदार निवडून विधानसभेत जातो. त्यावेळी ती व्यक्ती एकटी नसून, तिच्या मागे मतदारसंघातील लाखो व्यक्ती असतात. यामुळे मतदारसंघातील कामे होणे अशी माफक अपेक्षा लोकप्रतिनिधीची असते. मात्र, सत्ताबद्दल झाल्यावर निधीवाटपता दुजाभाव केला जातो असा सतत आरोप होतो. यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना निधीचे वाटप करण्यात येत नाही, असे देखील बोलले जाते. या सगळ्या गोष्टींचा फटका विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना देखील बसला. यामुळे येथील विकास कामांवर अंकुश आला. 2020 मध्ये अशोक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळी वेल्ह्यातील प्रशासकीय इमारत मंजूर करण्यात आली. या इमारतीला तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने त्यांनी इमारात मंजूर केली म्हणून विरोध केल्यामुळे या इमारतीचे काम चार वर्षांपासून रखडले गेले होते. मात्र, तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकास कामांचे आणि नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
गावातील विकास कामे प्रत्येक गावात अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, सभामंडप, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अशी एक ना अनेक छोटी मोठी विकास कामे या ठिकाणी होत असल्याने येथील जनतेची पसंती आमदार संग्राम थोपटे पाहिला मिळत आहे.