सासवड: प्रतिनिधी बापू मूळीक
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुरंदरच्या वतीने पुरंदर तालुकास्तरीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे करण्यात आले होते. पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, पुणे प्राचार्य बी. आर. खेडकर यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले. भविष्यातील स्पर्धा परीक्षेचा पाया नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे, असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्वाच्या असतात असे मत पंचायत समिती, पुरंदरचे गट शिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी व्यक्त केले.
एज्युदुनिया स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इंदापूरचे संचालक वैभव हेगडे यांनी उपस्थित शिक्षकांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमासंबंधी मार्गदर्शन केले. नवोदय विद्यालयातील ग्रंथपाल व प्रवेश प्रक्रिया प्रमुख बर्डे यांनी नवोदय विद्यालयाची प्रवेश नियमावली तसेच परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया याविषयी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुरंदर तालुकाध्यक्ष शिवहार लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षक परिषदेच्या कामाची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष विजय पिलाणे यांनी दिला. यावेळी म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवडचे प्राचार्य दत्ताराम रामदासी, प्राचार्य प्रशांत कदम, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक कुंडलिक मेमाणे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, गुरुकुल अकॅडमी सासवडचे संचालक प्रा. संदीप टिळेकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यवाह दिपक भोसले, किशोर जगताप यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा कामथे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार दिपक भोसले यांनी मानले.