सासवड प्रतिनिधी : पूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारुपाला आलेल्या पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे आज श्रावणातील पाचव्या सोमवारी सासवड येथील मानाच्या तेल्या भुत्याच्या कावड मिरवणुकीने याञेची सांगता करण्यात आली .मंदिराच्या मुख्य शिवलिंगावरती आकर्षक फुलांची सजावट करुन निलकंठेश्वर पुजा साकारण्यात आली. शिवलिंगाची आकर्षक पुजा पाहुन भाविकांच्या डोळ्यांचे पेरणे फाटले.दिवसभरात दोन लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
आज पहाटे शिवलिंगास दही ,दुध व पंचामृतने आंघोळ घालण्यात आली.पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने दक्षिण मध्ये मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे, यांनी महापुजा केली .महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष कांचन राहुल कुल,भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार भुलेश्वर देवस्थान अध्यक्ष अरुण यादव,माळशिरसचे उपसरपंच अशोक यादव,युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माऊली यादव,ह भ प लक्ष्मण महाराज यादव,यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडापाशी भुलेश्वरास मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंघोळ घालण्यात आली. महाआरती करुन ढोल ताश्यांच्या गजरात कावड मिरवणूक काढण्यात आली. पाठीमागे बाप्पा मोरया रे ” या भजनाच्या तालावरती पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी “हर हर महादेव ” च्या जयघोषाने भुलेश्वर डोंगर दणाणून गेला. दुपारी चार वाजता मंदिराच्या प्रवेश द्वारावरती मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. त्यानंतर पालखीची महाआरती करुन भुलेश्वर याञेची सांगता करण्यात आली.
वहाने वनविभागाच्या कमाणीबाहेर अडवण्यात आल्याने वाहतुक कोंडी झाली नाही. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली.वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. दिवसभरात अनेक भाविकांनी अन्नदान केले.शिवलिंगाची फुलांची सजावट करण्यात आली.साडे चार वाजता भुलेश्वरच्या पालखीचे माळशिरस गावाकडे प्रस्थान करण्यात आले .माळशिरस गावात पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. राञी नऊ वाजता पालखीची गावात मिरवणुक काढण्यात आली.हर हर महादेवचा जयघोषाने महीनाभर सुरु असणा-या याञेची सांगता करण्यात आली.