इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील व शरद पवार यांच्या भेटीगाठी देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी कधी वाजविणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखविली. नुकतीच अजित पवार यांची जनसन्मान यात्रा इंदापूरमध्ये आली होती. त्या वेळेस अजित पवारांनी केलेल्या भाषणावर हर्षवर्धन पाटील प्रचंड नाराज असल्याचे दिसले. महायुतीचे इंदापूरमधून तिकीट जाहीर झाले नसतानाही अजित पवारांची भूमिका ही चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच मी स्वाभिमानी नेता असून, तत्वाशी तडझोड करणार नाही. असेही वक्तव्य त्यांनी भाषणात केले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात इंदापूरच्या जागेवरुन रस्सीखेच होत असून, ही जागा कोणाच्या पदरी पडणार अशी चर्चा रंगू लागली आहे. यातच मा. मंत्री आणि राष्ट्रीय साखर कारखाना समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे इंदापूरची जागा लढण्यासाठी इच्छुक आहेत. या विषयाला धरुन अनेक न्यूज चॅनेल त्यांच्या मुलाखती घेत आहेत. इंदापूरच्या जागेसाठी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की ही जागा मी लढवावी. तशी इच्छा अनेकांनी माझ्याजवळ बोलली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्यात उमेदवारी डावल्यामुळे अनेकांनी दुसऱ्या पक्षात जाणे पसंत केले आहे, यावर बोलताना पाटील म्हणाले तसा सध्या काही विचार केलेल्या नाही. परंतु, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, मी निवडणूक लढवावी. त्यातच येत्या दोन ते दिवसांमध्ये निर्णय जाहीर करणार असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्या आहेत. यामुळे हर्षवर्धन पाटील आपल्या तुतारी तर घेणार नाही ना, असे देखील बोलले जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील राम कृष्ण हरी वाजवा तुतारी च्या घोषणा दिल्या असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आता हर्षवर्धन पाटील कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.