भोर : सध्या शासन सर्वत्र गावा गावातुन विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.या योजनांचा लाभ सर्वसामान्याना , गरजूंना कसा मिळेल याकरिता शासन विविध उपक्रम गावात घेत गावातील पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती मार्गदर्शन देऊन या योजनांची अंमलबजावणी गावात कशा पद्धतीने होईल,याचा फायदा लाभ गावातील गरजू नागरिकांना कसा होईल हे पहात आहे. यामध्ये सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक ,सदस्य असे महत्त्वाचे पदाधिकारी गावात नेमलेले आहेत परंतु हेच पदाधिकारी सध्या गावात नसल्याने येणाऱ्या योजना मात्र कागदावरच रहात असुन गरजूंना यांचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे
भोर तालुक्यातील ब-याच गावातील विशेषतः दुर्गम भागातील वेळवंड, भुतोंडे ,हिरडस मावळ, वीसगाव -चाळीस खो-यातील सरपंच , उपसरपंच व पोलीस पाटील हे गावपुढारी सह्या करण्यापुरते गावात येत असुन वास्तव्यास मात्र बाहेरगावी, परगावी असुन नुसते मानधनाचे पदाधिकारी असे चित्र आहे. सध्या पोलीस पाटलांना मानधनात दुप्पट वाढ होऊन पंधरा हजार मानधन व सरपंचांना तीन हजार मानधन आहे. बाहेरगावी वास्तव्यास असणाऱ्या पदाधिका-यांबाबत प्रशासन मात्र याबाबत कोणतेही ठोस पावलं उचलत नसल्याचे दिसत आहे.
गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, गावातील अनुचित घटना भांडण तंटे टाळण्यासाठी ,नैसर्गिक आपत्ती संकटापासून गावाला वाचवण्यासाठी, साथीच्या आजारापासून गावात होणारा संसर्ग रोखण्यासाठी , गावच्या संरक्षणासाठी प्रशासकीय पोलीस पाटील हे पद भरती प्रक्रियेने गावात नेमत आहे. उपविभागीय प्रांताधिकारी व पोलीस स्टेशन यांच्या मार्फत यांचे कामकाज चालते परंतु पोलीस पाटील या पदावर भरती झालेले पाटील मात्र पोलिस स्टेशनच्या रजिस्टरला सह्या करण्यापुरते गावात येत असुन बाहेरगावी फिरण्यात दंग आहेत. कित्येक गावात मागील काही दिवसांत रात्री अपरात्री नैसर्गिक, भौगोलिक, सामाजिक, चोरीच्या, अपघाताच्या, चांगल्या -वाईट अशा घटना घडल्या. परंतु पाटील गावात नसल्याने याची माहिती प्रथम पोलीस स्टेशनला गावकऱ्यांकडून मिळाली व नंतर पाटील गावात येऊन माहितीचा शोध घेऊ लागले अशी परिस्थिती झाली.
सरपंच, उपसरपंच यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे.सरपंच निवडताना गावात असणारी मोठी भावकी, सत्ता ,पैसा, गट, राजकीय पक्षाचा हस्तक्षेप अशा अनेक परिस्थितीतून कधी गावात न फिरकणारा, समाजात नसणारा बाहेरगावी वास्तव्यात असणारा माणूस निवडला जात आहे.नंतर मात्र पश्चाताप करत उगाच निवडून दिला असा सरपंच, उपसरपंच असे गावकरी बोलत आहेत. गावात जे खरोखर प्रामाणिकपणे पदाधिकारी काम करत आहेत त्यांना मात्र बाहेरगावी राहणाऱ्या या पदाधिकाऱ्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असे अनेकांकडून सांगण्यात आले आहे.
” भोर तालुका हा दुर्गम भागात वसलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातुन गावागावातून पोलीस पाटील यांनी चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असलेच पाहिजे. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गाव प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा पोलीस पाटील असून त्यांनी गावात हजर राहणे अत्यंत गरजेचे आहे”. डॉ.विकास खरात -उपविभागीय अधिकारी/ प्रांताधिकारी भोर