मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक अनुचित घटना घडल्या असून, या घटनांमुळे कायदा सुवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा मुद्दा देखील बदलापूर किंवा त्या आधी व नंतर घडलेल्या अनेक घटनांमधून आधोरिखेत झाला आहे. यावर आता शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी एक परिपत्रक (शासन आदेश) प्रसिद्ध केले असून, या शासन आदेशामध्ये उपाययोजनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही नवीन उपयायोजना लागू करण्याचा मानस शासनाचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
१. सीसटीव्ही कॅमेरा बंधनकारक
या आदेशामध्ये शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासणे अनिवार्य असणार आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास सर्वप्रथम शाळेतील मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीने कारवाई करणे गरजेचे असणार आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा सीसीटीव्हीतील फुटेज तपासणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच या फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास सर्वप्रथम स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे.
२. कर्मचाऱ्याचे चारित्र्य पडताळणी गरजेची, ६ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी
शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती करताना त्यांचे वर्तन पाहणे तसेच त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असणार आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलिसांकडून प्राप्त करुन घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच निमणूक केलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो आणि त्याची माहिती पोलिसांना द्यावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्त करताना ६ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.
३. तक्रार पेटी अनिवार्य
शासकीय तसेच खाजगी शाळेत तक्रार पेटी बसविण्यात यावी. या तक्रार पेटीमध्ये आलेल्या तक्रारींची पडताळणी करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कसूर केल्यास शाळेतील मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
४. विद्यार्थी सुरक्षता समितीचे गठन
शाळेत विद्यार्थ्यांसोबत लैंगिक शोषणाचे प्रकार घडत आहेत. याचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आता शाळेत विद्यार्थी सुरक्षता समिती गठित करण्यात येणार असून, ही समिती विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणण्याचे काम करणार आहे.