खंडाळा: गेल्या चार दिवसांपासून ऐन सण-उत्सवाच्या काळात शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने या प्रभागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी खंडाळा नगरपंचायतीला यासाठी निवेदन दिले. खंडाळा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. सलगच्या सुट्ट्या, रक्षाबंधन यामुळे अनेक नागरिकांकडे नातेवाईक पाहुणे आलेले आहेत. अशातच पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यासोबतच पाहूणे मंडळींसमोर गावाची प्रतिमादेखील मलीन होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. असे या निवेदनात लिहिण्यात आले आहेत.
तसेच प्रभागात पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनली असून, नगरपंचायत प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन देताना अक्षय जाधव आकाश लिमन, सुमित जाधव, ज्योतिबा जाधव, विजय जाधव उपस्थित होते. या निवेदनानंतर काही वेळातच प्रभाग सातमध्ये पाणी सोडण्यात आली असल्याची माहिती आहे.