प्रतिनिधी काशीनाथ पिंगळे
लोणी-भापकर : ग्रामपंचायत सस्तेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांनी एकत्र येऊन संगनमताने चालवलेल्या भ्रष्ट कारभारांची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या सस्तेवाडी येथील रहिवासी भारतीय जनता पक्षाचे पंचायतराज गाव प्रमुख संयोजक नानासो जगन्नाथ जगदाळे यांनी आता थेट बारामती पंचायत समिती येथे “अर्धनग्न” आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या बाबतचे निवेदन नानासो जगदाळे यांनी गटविकास अधिकारी बारामती, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय दंडाधिकारी बारामती, तहसीलदार कार्यालय बारामती तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, बारामती शहर, वडगाव निंबाळकर आदी ठिकाणी दिले आहे.
ग्रामपंचायत सस्तेवाडी येथे मोठ्या प्रमाणात विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु असून, यामध्ये पंचायत समिती बारामती येथील काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा होत आहे. याबाबत विकासकामांची माहीती घेतली असता, विकासकामांमध्ये अनियमितता असल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच ग्रामपंचायतीचे खोटे शिक्के बनवून वापरणे, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य या सर्वांनी संगनमताने खोटे ग्रामसभेचे ठराव करणे, याबाबत जगदाळे यांनी तक्रारी अर्ज तसेच स्मरणपत्रे वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयांना पाठवूनही याची दखल घेतली जात नसल्याने अखेर जगदाळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिलेल्या अर्जावर त्वरित कारवाई न झाल्यास दि. ९ ऑगस्ट रोजी पंचायत समिती बारामती येथे अर्धनग्न होत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सध्या राज्यात व केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच जर भ्रष्टाचार करणा-यांवर कारवाईसाठी असा संघर्ष करावा लागत असेल, तर ही व्यवस्था भ्रष्टाचाराने किती बरबटलेली आहे याचा अंदाज येतो. आता पुढे संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.