जेजुरीः येथील साकुर्डे गावाच्या हद्दीत असणाऱ्या ‘रॅायल शेतकरी’ या हॅाटेलच्या पार्किंगमधून जूलै महिन्यात होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी विकी भिमराव गाडेकर (रा. चोपडच, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता, चोरीस गेलेले वाहन निरा व लोणंद या भागात विना नंबरने अज्ञात व्यक्ती फिरवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणंद पोलीस आणि बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या मदतीने संबधित गुन्ह्यातील रिकार्डवरील गुन्हेगारांची माहिती मागविण्यात आली. या माहितीत आरोपी ओम प्रकाश माने (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे), धीरज संजय गिरे (रा. येळेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा), रोहीत सदानंद शेळके रा. टोबरेमळा, ता. खंडाळा, जि. सातारा या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना पोलीसी खाक्या धाकविताच आरोपींनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्ह्यातील चोरलेली वाहने त्यांनी लोणंद येथील भाडोत्री रुमच्या बाहेर लावल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संबधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, तिथे आणखी तीन दुचाकी पोलिसांना मिळून आल्या. या दुचाकी आरोपींनी जेजुरी, सासवड आणि लोणंद हद्दीतील ठिकाणाहून चोरून नेण्याचे कारवाईत निषन्न झाले आहे. या कारवाईमुळे एका गाडीच्या शोधात गेलेल्या पोलीसांना आणखी तीन गाड्या मिळून आल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, संजय जाधव अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिक्षक भोर विभाग यांच्या सुचनेनुसार जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक इन्सपेक्टर तारडे, पोलीस हवालदार तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम, पोलीस कॅान्स्टेबल शुभम भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खाडे हे करीत आहेत.