भोर: भाटघर धरणाच्या पात्रालगत गाळ काढण्याचा परवाना घेऊन काही व्यक्ती धरण क्षेत्रातच बेकायदेशीर उत्खनन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ताल बांधून अतिक्रमण केल्याचा आरोप करत, स्थानिक शेतकऱ्यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.
भाटघर धरणाच्या पात्रातून बेकायदेशीर उत्खनन केल्याचा गंभीर आरोप
जोगवडी येथील काही शेतकऱ्यांनी भाटघर धरणाच्या पात्रातून बेकायदेशीर उत्खनन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, गाळ काढण्याचा परवाना घेऊन प्रत्यक्षात धरण क्षेत्रातच बेकायदा उत्खनन करत आहेत. ताल बांधून अतिक्रमण केल्याचा आरोपही यांनी केला आहे. सुरेश बबन धुमाळ आणि मंगेश सुरेश धुमाळ यांनी स्वतःच्या मालकीची जमिनी सोडून धरण पात्रात अतिक्रमण केले आहे. धुमाळ भावकीची मिळून सर्व्हे न. १ मधील गट न. ४३ आणि ५१ मधील क्षेत्र ०.८३ पैकी सुरेश धुमाळ आणि मंगेश धुमाळ यांना ०.८० आर क्षेत्र कुळकायद्याप्रमाणे मिळाले आहे. मात्र, त्यांनी स्वतःच्या हिश्याची जमिनी सोडून धरण पात्रात अतिक्रमण केले आहे.मात्र अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप जोगवडीतील गणपत बळवंत धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीत केले आहे.
याबाबत तहसीलदार सचिन पाटील यांच्या म्हणण्यानुसार, “हा विषय पाटबंधारे विभागाच्या हद्दीतला आहे. मला दिलेले पत्र पुढील कारवाईसाठी पाठविले आहे .पाटबंधारे विभागाने आम्हाला कारवाई करण्याचे पत्र दिल्यानंतर आम्ही पंचनामा करून कारवाई करू.
भाटघर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता गणेश टेंगले यांनी सांगितले की, “जोगवडी येथे अतिक्रमण झालेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. शासनाने दिलेल्या कायद्याच्या निर्देशानुसार भाटघर धरण क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी सामूहिक मोहीम राबविणार आहोत.धुमाळ यांच्या तक्रार आल्या नंतर धुमाळ यांना गाळ उपसासाठी दिलेला परवाना आम्हाला हद्द निश्चित होत नसल्याने रद्द असून त्यासंबंधी पत्र स्थानिक तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहे”
तसेच अधिक माहितीसाठी यावेळी सुरेश बबन धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी म्हटले आहे की, “आमचे क्षेत्र धरणाच्या रेड झोनमध्ये येत नाही. आम्ही मालकी जमिनीच्या हिश्यातच नकाशानुसार मोजणी करून शेतीसाठी गाळ काढला आहे. आम्ही परवाना घेऊन गाळ काढत असताना जलाशय पात्रातून दगड धोंडे येत असतात ते एका बाजूला लावले आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नाही.” तसेच आमचे अतिक्रमण आढळले तर मी स्वतः ते हटवण्यास तयार आहे परंतु कारवाई करत असताना संयुक्त कारवाई करावी.
या प्रकरणात पाटबंधारे विभाग आणि तहसील कार्यालय यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी तक्रारीत केलेल्या आरोपांची सत्यता तपासून, योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.