जीवन सोनवणे
भोर | तालुक्यातील निगडे येथे जमिनीच्या वादातून एका वजन काटा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार्यालयात घुसून कोयता, लोखंडी रॉड आणि बांबूने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे निगडे परिसरात खळबळ उडाली आहे.
निशिकांत उदयसिंग मांढरे (वय ५२, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांचा निगडे येथे साई धर्म वजन काटा असून ते दगडी कोळसा विक्रीचा व्यवसाय करतात. ११ ऑक्टोबर रोजी ते आपल्या कार्यालयात बसले असताना ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली सिताराम पांगारकर, आकाश पांगारकर, सागर पांगारकर यांच्यासह अन्य तीन ते चार जण कार्यालयात घुसले.
आरोपींनी शर्टाच्या मागे लपवून आणलेल्या कोयत्याने, लोखंडी रॉडने आणि बांबूने मांढरे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या तळहातावर दुखापत झाली. भावाकडून विकत घेतलेली जमीन आमच्या नावावर करून दे, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. त्यानंतर स्कॉर्पिओ आणि नंबरप्लेट नसलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी १९ नोव्हेंबर रोजी राजगड पोलीस ठाण्यात तिघांसह अन्य तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.










