राजगड: तालुक्यातील कोदवडी फाटा येथे रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दशरथ शिळीमकर आणि मस्कु दसवडकर हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ४ ते ५ आरोपी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन आरोपींची ओळख पोलिसांना पटली असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. घटनेनंतर पोलिस प्रशासनाने तातडीने हालचाली करत जिल्हाभर नाकाबंदी केली आहे. विविध ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुना वाद की अन्य काही कारण याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित करण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजगड तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.










