भोर – तालुक्यात २०२५ चे पर्युषण पर्व म्हणजेच जैन धर्मियांचा पवित्र वार्षिक सण भोर शहरातील मंगळवार पेठेत असलेल्या जैन श्वेतांबर श्री संघ मंदिर येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम करून साजरा करण्यात आला.
बुधवार दि. २० ते शुक्रवार दि.२९ पर्यंत जवळपास नऊ दिवस पर्युषण पर्व सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची सजावट व देवाला आरास केली होती. धर्म शाळेमध्ये दररोज उपवास, धार्मिक ग्रंथवाचन, प्रार्थना, प्रवचन ,किर्तन आणि सत्संग पालखी प्रदक्षिणा असे या पर्वात कार्यक्रम करण्यात आले .कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी सहा वाजता ,सात वाजता भक्तांम्बर पाठ , नऊ वाजता प्रवचन ,सायंकाळी किर्तन असे कार्यक्रम नऊ दिवस करण्यात आले यावेळी शहरातील मोठ्या संख्येने जैन धर्मिय समाज बांधव उपस्थित होते.सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.शेवटच्या दिवशी महाप्रसाद झाला. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तपोवनवरून तीन जैन धर्मगुरुजी आले होते. त्यांनी नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेतले.या पर्वातील कार्यक्रमांचे नियोजन भोर शहर जैन समाजाचे अध्यक्ष लालचंद कुंदनमल ओसवाल ,उपाध्यक्ष रमेश ओसवाल व ट्रस्टी जितेंद्र ओसवाल, जयंतीलाल ओसवाल तसेच युवा कार्यकर्त्यांनी केले.
पर्युषण महापर्व हा जैन धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र वार्षिक सण आहे, जो आत्मनिरीक्षण, आत्मशुद्धी, पश्चात्ताप आणि क्षमा यावर आधारित आहे. हा सण ८ दिवस चालतो आणि त्यात उपवास, धार्मिक ग्रंथवाचन, प्रार्थना आणि सत्संग यांचा समावेश असतो.तसेचहा काळ स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी आणि आंतरिक शुद्धी करण्यासाठी असतो असे या समाजाचे युवा कार्यकर्ते अमर ओसवाल यांनी सांगितले.

















