खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गालगत शिंदेवाडी गावाच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याजवळ २५ वर्षीय सौरभ स्वामी आठवले या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणात खुनाचा संबंध प्रेमप्रकरणातून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, राजगड पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, पुणे) असे असून तो आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. सोमवार (दि. १८ ऑगस्ट) संध्याकाळपासून सौरभ बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी कात्रज पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी शिंदेवाडी हद्दीत महामार्गालगत टेकडीवरील झुडपात त्याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला.
प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने वार करून सौरभचा खून केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मृताचा भाऊ संग्राम स्वामी आठवले (रा. मानाजीनगर, पुणे, मूळ रा. मोहोळ, सोलापूर) यांनी राजगड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
दरम्यान, पुढील तपासात पोलिसांनी खुनामागे प्रेमसंबंधातील वाद हे कारण असल्याचा संशय व्यक्त केला असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची सविस्तर चौकशी सुरू असून, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.