भोर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली येथे व्हर्च्युअल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून शाळा स्मार्ट शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती रणजीतदादा शिवतरे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
डिजिटल डेन पुणे व शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या क्लासरूमचे उद्घाटन शालेय शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार सोहळा आयोजित करून करण्यात आले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अद्वैत दळवी, काव्य शेडगे व विघ्नेश येडवे हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत पात्र ठरले. त्यांचा व मार्गदर्शक शिक्षक अमर उभे यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाळेत आधीपासूनच सोलर सिस्टिम, संगणक शिक्षण, एम.एस.सी.आय.टी प्रशिक्षण, आधुनिक ग्रंथालय, प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूम अशा सुविधा उपलब्ध असून या सोयींमुळे परिसरातील अनेक विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत. परिणामी शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे रणजीतदादा शिवतरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर खेळ, कला, संगीत, नाट्य, क्रीडा अशा विविध अंगांनी प्रगती करावी तसेच प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, नवोदय, एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुढील वर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सायकल देण्याची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. या सोहळ्याला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश शिवतरे, भगवान शिवतरे, शिवाजी शेटे, सचिन शिवतरे, सागर कुंभार, दशरथ शेटे, अशोक शेटे, सुनील सुतार, सारिका शिवतरे, स्नेहल शिवतरे, नंदा धोंडे, मनोज खोपडे, सचिन पाटणे, रघुनाथ भोसले, शामराव सावले, अविनाश उभे यांच्यासह अनेक शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.