भोर : पुणे-सातारा महामार्गावर सारोळा गावच्या हद्दीत निरा नदीवरील पुलाखाली एका पोत्यात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीच्या या व्यक्तीचा हात-पाय बांधलेला असून, त्याच्या गळ्यावर व्रण तसेच उजव्या हातावर “ॐ” कोरलेले असल्याचे आढळून आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक पंचनामा करण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तीने हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकल्याचा संशय आहे.
या प्रकरणी मयूर निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानाची वाडी परिसरात हा मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राजगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.