माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
भोर – शहराच्या नजिक भोलावडे गावातील भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयातील सन २०००-२००१ दहावी ब च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.८) रा.र.विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.या मेळाव्यात पंचवीस वर्षांनी विद्यार्थी एकत्रित येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच शाळेतील माझी विद्यार्थी या नात्याने शाळेतील दहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे . पहिल्यांदा व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून स्नेह मेळाव्याचे नियोजन केले होते. भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालय येथील राजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. शाळेतील कला शिक्षक विश्वास निकम यांनी शाब्दिक स्वरूपात सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी माजी विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून आवर्जुन उपस्थित राहिले होते .
या शाळेविषयीचे प्रेम व शाळेविषयी भविष्यात योगदान देण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली . त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे राजेंद्रराजे पंतसचिव यांच्या समितीचे सदस्य गौरव लेले , संतोष चोबळ , पूजा चोबळ यांच्या शुभहस्ते पंचवीस वर्षाच्या निमित्त टीशर्टचे अनावरण करण्यात आले. दरम्यान भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गुजर व माजी शिक्षक आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थी विनोद बोडके, कमलेश धुमाळ , समीर घोडेकर , विकास शिळीमकर व गणेश पोतदार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी अंकुर जेधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, ऋषिकेश कोळसकर यांनी सूत्रसंचालन केले तर केतन भूतकर यांनी आभार मानले . वीरेंद्र शिंदे , रिजवान शेख , स्वप्निल पवार , अतुल सूर्यवंशी व विशाल यादव यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. शाळेच्या मार्फत सर्व माजी विद्यार्थ्यांना राजा रघुनाथराव विद्यालयाची प्रतिमा असलेला फोटो भेट देण्यात आला .