भोर– तालुक्यातील वाठार हिमा (ता.भोर) येथे शनिवार (दि.१) गणेश जयंती निमित्त आयोजित हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमात विधवा महिलांना हळदीकुंकूचा मान देण्यात आला.
वाठार येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांच्या हळदीकुंकू समारंभात खास करून विधवा, गंगा भागीरथी महिलांना हळदीकुंकूचा मान देण्यात आला. यासाठी सरपंच सविता खाटपे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी विशेष प्रयत्न करत विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान दिला. विधवा महिलांना गंगा भागिरथी म्हणून संबोधले जावे तसेच सर्वच ठिकाणी विधवांना मानसन्मान मिळावा यासाठी ग्रामीण भागातही प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, तालुक्यातील सर्व महिला बघिणी या समाजपयोगी उपक्रमात सदैव मदत करण्यास तयार असल्याचे महिला अध्यक्षा सिमा तनपुरे यांनी यावेळी सांगितले
यावेळी सदर कार्यक्रमास या गावातील विद्यमान महिला सरपंच सविता खाटपे, रत्नमाला समगिर, अरुणा कुमकर, द्रोपदी भेलके, मनिषा पडवळ, अर्चना रोमण, माधुरी दबडे, सीता कोंढाळकर, निशिगंधा क्षीरसागर आदी महिला उपस्थित होत्या.