बारामतीः नव्या मंत्रीमंडळात अनेक जेष्ठ नेत्यांना स्थान दिले नसल्याने त्याचे पडसाद संबंध राज्यभरात उमटताना दिसत आहेत. मा. मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी झाली असून, नाशिकसह विविध ठिकाणी या गोष्टीचा निषेध करण्यात येत आहे. आज दि. १७ डिसेंबर रोजी बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानी सकल ओबीसी समाजाच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात बारामती शहरातील सकल ओबीसी बांधवांना सहभाग घेतला होता.
या मोर्च्याच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भुजबळ हे जेष्ठ नेते असून त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सहभागी भुजबळ समर्थकांनी हाताच्या दंडावर या निषेध म्हणून काळ्या फिती बांंधल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अजित पवार यांच्या घरासमोर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भुजबळ समर्थकांकडून त्यांचा मंत्रीमंडळात समावेश व्हावा यासाठी मागणी जोर धरु लागली आहे.