सोलापूरः परभणी येथील मोठ्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले असून आंंबेडकर अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. धुळ्यात १० ते १२ जणांनी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर आता सोलापूरात देखील एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
धुळ्यात दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. या घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. या घटनेपाठोपाठ सोलापुरात देखील एसटी बसवर दगडफेकीची घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींने तीन एसटी बसवर दगडफेक केली आहे.
सोलापुरातील डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सोलापूरहून तुळापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहून साताऱ्याला जाणाऱ्या एक गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही दगडफेक नेमकी कुणी केली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सोमनाथ यांचा मृत्यू अन् तणाव वाढला
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार उसळून आला होता. यामध्ये लोकं रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले होते. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. काल (रविवार 15 डिसेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडीत असतानाचा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांवर विविध आरोप केले जात असून आंबेडकरी अनुयायींच्या बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत.