शिरवळः दारुची नशा कोणाला काय करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही. नशेत माणूस काहीही करु शकतो अशा प्रकारच्या अनेक घटना राजरोसजपणे होताना दिसत आहे. आजच दि. ६ डिसेंबर रोजी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील मद्यधुंद नशेत असलेल्या एकाने रस्त्याने जात असलेल्या चार ते पाच वाहनांना धडक देत अपघाताची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी या अपघाताच्या घटनेत झाली आहे. शिरवळ परिसरात राहणाऱ्या तरुणांनी दारुच्या नशेत एका महिलेला शिवीगाळ करीत महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने शिरवळ पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. सदर घटना ही २९ नोव्हेंबर रोजी शिरवळ परिसरात असलेल्या दाऊद मलिक दर्गा येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना २९ नोव्हेंबरला घडली असली तरी पीडित महिलेने आज दि. ६ डिसेंबर रोजी शिरवळ पोलिसांत फिर्याद दिली.
या प्रकरणी एकूण ८ संशयित आरोपींवर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार विविध कलन्मावये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका पीडित महिलेने शिरवळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. गणेश गुरुदेव बरदाडे, सनी जयकुमार बरदाडे, हरिश गुरुदेव बरदाडे, अमित जयकुमार बरदाडे, निलेश अशोक सोनवणे, गणेश दत्तात्रय आवटे, मिलींद संतोष कुंभार, राजन बाळासाहेब तारू अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अन् ‘अशी’ घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या घराशेजारी दाऊद मलिक नावाचा दर्गा आहे. या दर्ग्याची देखरेख करण्याचे काम हे संपूर्ण कुंटुब करते. दि. २९ नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आणि त्यांच्या नणंद यांनी दर्ग्याचे कुलूप लावत असताना त्या ठिकाणी त्याच परिसरात राहणारे गणेश गुरुदेव बरदाडे आणि त्याच्यासोबत ७ जण असे एकूण ८ जण तिथे दारुच्या निशेत आले. यावेळी या सर्वांना दारुच्या नशेत असल्याचे पाहून या दोन्ही महिला खूप घाबरल्या होत्या. या ८ जणांपैकी गणेश बरदाडे आणि हरिष बरदाडे यांनी पीडित महिलेला तू हित कशाला आलीस तुझ्या नवऱ्याने आमचा हातभट्टीचा व्यवसाय बंद केला आहे. तुम्हाला आता मोडायला पाहिजे, अशी धमकी दिली. तसेच जातीवचाक शब्दांचे उच्चारण करुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देखील गणेश बरदाडे याने यावेळी दिली. यानंतर घाबरलेल्या दोन्ही महिलांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील लोक तिथे जमले. असे फिर्यादीत महिलेने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप हे करीत आहेत.
आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर गुन्हा दाखल
सुरुवातीस याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र पीडित महिलेच्या पतीने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.