जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाचा मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेत चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली. आज. दि. २ नोव्हेंबर रोजी मुख्य गाभाऱ्यातील पाखळणी उरकल्यानंतर श्रींच्या मुख्य उत्सवमूर्ती बालद्वारीमध्ये स्थापना करण्याकरिता नेण्यात आल्या. जय मल्हार चंपाषष्टी अन्नछत्र प्रतिष्ठान, पुजारी सेवेकरी वर्गाकडून सालाबादप्रमाणे घटस्थापना प. पू. आद्य श्री नृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या शुभहस्ते दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली. देवाला या उत्सवालानिमित्ताने भरझरी पोशाख परिधान करण्यात आला. चंपाषष्ठीदिवशी मणी मल्य दैत्यांचा संहार करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता. त्यास चंपाषष्ठी असे म्हणातात. तसेच यावेळी चाफ्यांच्या फुलांची उधळण करण्यात आली होती. म्हणून चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात येतो.
वेदमूर्ती पुरोहित शशिकांत सेवेकरी काका, मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चाराच्या व घडशी समाजाच्या सनई चौघडा वादनामध्ये विधिवत पूजा अभिषेक करून उत्सव मूर्ती घटस्थापनेच्या ठिकाणी बसविण्यात आल्या. यावेळी मार्तंड देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, अनिल सौंदडे तसेच पुजारी सेवेकरी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, चेतन सातभाई, बाळासाहेब दीडभाई, देवल बारभाई, मल्हार बारभाई, धनंजय आगलावे, हनुमंत लांघी, समीर मोरे आदी पुजारी सेवेकरी, मानकरी, खांदेकरी जेजुरीकर ग्रामस्थ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.