भोरः पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता.भोर) ते सारोळा दरम्यान बेकायदा पद्धतीने येथील व्यावसायिकांनी सेवारस्त्यावरील दुभाजक तोडल्याने सेवारस्ते हे वाहुकीसाठी धोकादायक बनल्याचे समोर आले आहे. बेकायदा तोडलेल्या दुभाजकांमुळे येथील सेवारस्त्यावर अपघातांची संख्या वाढताना दिसत असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
‘या’ उपाययोजना करण्याची गरज
१. गंभीर स्वरुपाचा अपघात घडल्यास जबाबदार कोण?
या महामार्गावरील सेवारस्त्यांची कामे अपूर्ण असून रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच रस्त्यावरील दुभाजक तोडल्याने चुकीच्या दिशेने (विरुद्ध बाजूने) येणारी वाहने अपघातास कारण ठरत आहेत. जर यावर तात्काळ उपायोजना करण्यात आली नाही, तर भविष्यात गंभीर स्वरुपाचा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण?
२… तर तुम्ही जबाबदार असाल!
या गंभीर बनलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या अपघातांना एनएचएआय, रिलायन्स इन्फ्रा आणि बेकायदा दुभाजक तोडणारे व्यावसायिक जबाबदार असतील, असे नागरिकांनी ठामपणे सांगितले आहे. तसेच याबाबतचे निवेदन राजगड पोलीस ठाण्यात देण्यात आले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील सेवारस्त्यांची डागडुजी, बेकायदा तोडलेल्या दुभाजकांची दुरुस्ती आणि नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई प्रशासनाने करावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
गंभीर दृष्टिकोन ठेवणे गरजेचे
मूळात येथील व्यावसायिक स्वःताच्या सार्थापोटी सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करू पाहत आहेत. महामार्ग प्रशासनाची मात्र हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका असल्याने या समस्येकडे गंभीर दृष्टिकोन ठेवून पाहणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.