भोरः भोंगवली फाटा माहूर परिंचे या ४९ किमी अंतराच्या रस्त्याच्या कामाची निविदा महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये काढण्यात आली होती. सुमारे ३ कोटी ७० लाख रूपयांच्या सदर रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील मिळाली आहे. हे रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या एका वर्षाच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असताना देखील अद्यापर्यंत या रस्त्याच्या कामाला के.डी. सोनवणे या ठेकेदाराकडून सुरूवातच झालेली नाही. अवघ्या एका महिन्याने २०२४ हे वर्ष संपून २०२५ हे नवे वर्ष उजाडेल. मात्र, गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून या रस्त्याच्या कामाला मूहुर्तच मिळाला नसल्याने नागरिकांच्या तीव्र स्वरुपाच्या भावना उमटत आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरूवात न केल्यास पूर्व भागातील नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्व भागातील नागरिकांनी गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून सबंधित कामासाठी पत्रव्यवहार केला. सदर काम हे लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी देखील नागरिकांंनी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून केली होती. संबंधितांकडून त्यांच्या पत्राला काम हे पुढील काही दिवसात सुरू होईल, असे आश्वासन मिळाले. मात्र, असे असताना प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालीच नाही. ठेकेदाराकडून कामात दिरंगाई करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच ठेकदार सदर रस्त्याच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे देखील नागरिक सांगत आहे. याप्रकरणी सदर काम करणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.
….आता नागरिक एकवटले
पूर्व पट्यातील नागरिक एकवले असून, सदर काम पुढील चार ते पाच दिवसांत सुरू न झाल्यास अत्यंत तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय स्वरूवाची झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकवेळा या रस्त्यावरून अपघाताचे प्रसंग देखील घडलेले आहे. यामुळे कोणाचा जीव गेल्यावरच कामाला सुरूवात होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित काम हे ज्या ठेकेदाराला दिलेले आहे, त्याने हे काम २५ टक्के कमीने घेतले आहे. यामुळे हे होणारे काम किती निकृष्ठ दर्जाचे असेल, हे आपल्याला दिसत आहे. संबंधित कामाला मागील फेब्रुवारी २०२४ मध्ये मंजुरी मिळाली. तरी अद्यापर्यंत हे काम सुरू झालेले नाही. हे काम जर पुढील चार दिवासांत सुरू करण्यात आले नाही, तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन पूर्व भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात येईल.
चंद्रकांत बाठे( मा. जिल्हा परिषद सदस्य)
भोंगवली फाटा ते माहूर खिंड या रस्त्याचे काम पुढील चार दिवसांत सुरू केले जाईल.
हल्लाळ( सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता)