भोरः राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची घटिका समील आली असली तरी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून उमदेवाराच्या विजयाचे बॅनर झळकविण्यात येत आहे. भोर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या विजयाचा बॅनर पुणे-सातारा मार्गावरील शिंदेवाडी येथे लावण्यात आल्यानंतर आता आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या देखील विजयाचे बॅनर त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले आहे. थोपटे यांचा विजयाचा बॅनर सारोळा येथील परिसरात लावण्यात आला आहे. यामुळे आता भोरमध्ये विजयाचे बॅनरवॅार सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून आपल्या उमेदवारांना घेऊन असलेल्या विजयाची खात्री या बॅनरवॅारमधून पाहिला मिळत आहे. येथे यंदाची निवडणूक मोठी चुरशीची झाल्याने बंडखोरी करून अपक्ष उभे राहिलेल्या उमेदवारांना मिळालेली मते कुणासाठी घातक आणि कुणासाठी विजय ठरणार हे पाहणे औचुक्याचे असणार आहे. भोर विधानसभेची निवडणूक थोपटे विरुद्ध मांडेकर अशी थेट झाली असे म्हणणे उचित होणार नाही. याचे कारण म्हणजे बंडखोरी करून अपक्ष निवडणुकीला सामोरे गेलेले कोंडे आणि दगडे अशी चौरंगी लढत इथली झाली. यामुळे २३ नोव्हेंबर रोजी विजयाचा गुलाल कोण माथी लावणार यासाठी २४ तासांची वाट पाहवी लागेल.