जेजुरीः पुरंदर २०२ विधानसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १४.४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २७.३५ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४०. ३२ टक्के आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.०२ टक्के एकूण मतदान झाले. मतदानाची शेवटची वेळ सायंकाळी ६ वाजाताची असल्याने या टक्केवारीत बदल होऊ शकतो. यामध्ये एकूण २ लाख ४६ हजार ९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण ५३.३५ टक्के तर महिला मतदारांचे प्रमाण ५२.६६ इतके होते. इतर ६.०६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. वरील आकडेवारी पाहता सर्वाधिक मतदान हे ३ वाजेनंतर झाले असल्याचे दिसून येत आहे.
सर्व मतदान केंद्रांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवमतदारापासून ते अगदी वयोवृद्ध मतदारांनी लोकशाहीला बळकट करण्याठी मतदानाचा हक्क बजाविला. मतदान केल्यानंतर मतदारांना फोटो काढण्यासाठी मतदान केंद्रांवर सेल्फी पॅाईट देखील ठेवण्यात आले होता. शंभरी पार केलेल्या अनेक मतदानदारांनी देखील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. तालुक्यातून बाहेगावी कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या मतदारांनी देखील त्यांच्या गावी येत मतदानाचा हक्क बजाविला.
उमेदवारांनी बजाविला मतदानाचा हक्क
पुरंदर विधानसभा मतदार संघातील संजय जगताप यांनी सासवड येथील केंद्रावर, संभाजी झेंडे यांनी त्यांच्या मूळ गावी दिवे तर विजय शिवतारे यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजाविला.
उंड्री येथे दिव्यांगांसाठी व्हेलचेअरची व्यवस्था
पुरंदर विधानसभा मतदार संघांमधील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उंड्रीमधील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल येथे विशेष मतदान केंद्र (unique polling station) ची उभारणी करण्यात आली होती. या मतदान केंद्राला विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, स्वयंसेवक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.