नसरापूर: अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे झालेल्या पुणे-सोलापूर विभागीय आविष्कार २०२४-२५ स्पर्धेत वेगवेगळ्या वर्ग श्रेणीत नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविले आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हे सर्व औषनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवीच्या फार्मासुटीक्स आणि फार्माकोलॉजी या शाखेचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असून त्यांच्या विशेष अशा नावीन्यपूर्ण प्रकल्पावरील विचारांना सुवर्ण आणि रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. निमा समनाक, साक्षी मासये आणि शिवानी मिसाळ यांना नवीन संशोधनासाठी सुवर्ण पदक तसेच हर्षा पवार आणि प्रथमेष चोरघे यांना रौप्य पदक मिळाले.
या विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेसाठी फार्माकोलॉजी चे प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. अजय काळे व प्राचार्य डॉ. किशोर ओतारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या चौदा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रा. त्रुषाली मांढरे, प्रा. पूजा काशीद यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, समूह संचालक सागर सुके, उपाधक्षा सायली सुके, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.