कापुरहोळ, ता. भोर (जि. पुणे): भोर-कापुरहोळ रोडवरील एका दुर्दैवी अपघातात २६ वर्षीय तरुण जिम ट्रेनर अमोल दगडु दुरकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात कापुरहोळ येथील बारामती अॅग्रो लिमिटेडच्या रोहन डेअरी फार्मजवळ १९ जानेवारी रोजी घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमोल दगडु दुरकर (वय २६, रा. भोलावडे, ता. भोर) हा आपल्या दुचाकी (एमएच १२ पीजे ४९८४) वरून भोरहून कापुरहोळकडे जात होता. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपर (ड्रायव्हर ज्ञानेश्वर गुलाब बाबर, रा. वीर, ता. पुरंदर) याने भरधाव वेगात वाहन चालवताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले. अचानक उजव्या बाजूला वळण घेतल्यामुळे डंपरने अमोलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत अमोल गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर मार बसला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल हा परिसरात एक उत्कृष्ट जिम ट्रेनर म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अनंता एकनाथ दुरकर यांच्या फिर्यादीवरून डंपरचालक ज्ञानेश्वर बाबर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजगड पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.