पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे
यवत येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्यव्यापी माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशन नुकतेच माहिती अधिकार कायद्याचे जनक, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राळेगणसिद्धी येथे संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण आण्णा हजारे, माहिती अधिकार अभ्यासक, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, यशदाचे संशोधन अधिकारी दादू बुळे, तज्ञ प्रशिक्षक रेखा साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अमूल्य मार्गदर्शन केले व आपापसात पारिवारिक नाते जोडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विवेक वेलणकर, दादु बुळे व रेखा साळुंखे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करत असलेल्या महाराष्ट्रातील काही निवडक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दौंड तालुक्यातील यवत येथील राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट (माहिती अधिकार पुरस्कार २०२४) यशदाचे अधिकारी दादू बुळे, तज्ञ प्रशिक्षक रेखा साळुंखे, शिवाजी खेडकर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे कार्याध्यक्ष शेखर कोलते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर, प्रसिद्धीप्रमुख राहुल कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
राहुल अवचट हे गेल्या ९ वर्षांपासून माहिती अधिकार क्षेत्रात कार्य करीत असून अनेकांना माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील, तक्रार याबाबत मार्गदर्शन करत असतात. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार २०२४ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुल अवचट यांनी माहिती अधिकार महासंघाचे पदाधिकारी, पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे आभार मानले. तसेच सर्वांच्या सहकार्याने हा पुरस्कार मिळाला असून त्याबद्दल सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले. तर हा पुरस्कार माझा नसून माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसार करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा असून यापुढे देखील माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी कार्य सुरूच राहील, प्रत्येक नागरिकांना माहिती होण्यासाठी व याचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा, यासाठी यापुढे देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.