नसरापूर : भोर तालुक्यातील कापुरहोळ येथे मंगळवारी भरदिवसा १७ वर्षीय मुलाचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे अनोळखी पाच इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश उर्फ लखन काशिनाथ दळवी (वय ४२, रा. कापुरहोळ, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांचा मुलगा पृथ्वीराज महेश दळवी (वय १७ वर्षे ७ महिने) हा दि. ०३ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अॅक्टीवा (एमएच १२ टीएल ३००४) वरून घरी जात होता.
कापुरहोळ ते नारायणपूर रोडवरील गुरुकृपा मेडिकलसमोर एमएच १२ एक्सई ५३५३ क्रमांकाच्या कारमधील अज्ञात चालकाने त्याच्या गाडीसमोर कार आडवी घातली. त्यानंतर कारमधून उतरलेल्या पाच अनोळखी इसमांनी पृथ्वीराज याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. “तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” अशी धमकी देत आरोपींनी त्याच्या तोंडात पिस्तुलाची नळी घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल केली. संशयित वाहनाचा शोध घेत जेजुर येथील शिवारात जेजुरी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. वेळेत हस्तक्षेप केल्याने संबंधित मुलगा आणि संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांच्या या तत्परतेने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे कापुरहोळसह भोर तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.















