नसरापूर (प्रतिनिधी) : पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, युवा नेतृत्व विशाल कोंडे यांनी नसरापूर येथे आयोजित केलेल्या *‘आखाड स्नेह मेळाव्या’*ला तरुणाईसह नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्याला माजी आमदार संग्राम थोपटे आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांची उपस्थिती विशेष ठरली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शैलीत सूचक संदेश देत विशाल कोंडे यांच्या राजकीय भावी वाटचालीसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले.
या मेळाव्यात विशाल कोंडे यांनी स्पष्ट शब्दांत आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. त्यांनी सांगितले, “तालुक्याच्या विकासासाठी नव्या पिढीने पुढे येणं गरजेचं आहे. आमचं ध्येय केवळ निवडणूक लढवणं नाही, तर गावागावांतील समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी एक विश्वासार्ह पर्याय म्हणून उभं राहणं हे आहे.”
विशाल कोंडे यांच्या या जाहीर भूमिकेनंतर मंचावरील वातावरण अधिकच तापले. यावेळी बोलताना माजी आमदार संग्राम थोपटे यांनी “राजकारणात संयम व सुसंवाद महत्त्वाचा आहे. कोणत्याही निर्णयात घाई न करता सर्व पैलू विचारात घेणे आवश्यक असते,” अशा शब्दांत संयमाचे आणि धोरणशुद्धतेचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसरीकडे, विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी थेट स्पष्ट भूमिका घेत, विशाल कोंडे यांना आपल्या गटात सामील होण्याची ऑफर दिली. ते म्हणाले, “तुमचं नेतृत्व, ऊर्जा आणि जनसंपर्क पाहता आम्हाला वाटतं की तुम्ही आमच्यासोबत आलात, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला विजयी करण्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ. तिकडे काय सुरू आहे ते तुम्ही पहा, पण आमची दारे कायम तुमच्यासाठी खुली आहेत.”
मांडेकर यांच्या या स्पष्ट आमंत्रणानंतर उपस्थित कार्यकर्त्यांत कुजबुज सुरू झाली. तालुक्यातील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांची संख्या लक्षणीय होती. या मेळाव्याच्या माध्यमातून विशाल कोंडे यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. गावागावातून आलेल्या युवकांनी उत्साहाने सहभाग घेत संवाद साधला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विशाल कोंडे यांनी आभार मानताना सांगितले, “हे केवळ स्नेहमेळावा नव्हे, तर आमच्या कार्ययोजनांचा आरंभ आहे. आम्ही राजकारणात फक्त खुर्चीसाठी नाही, तर गावोगावी विकासाची दारे खुली करायला आलो आहोत.”
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भोर तालुक्याच्या राजकारणात नवा उत्साह, नव्या शक्यता, आणि नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचे स्पष्ट दिसून आले. विशाल कोंडे यांची भूमिका ठाम असून, त्यांच्याभोवती युवा वर्ग मोठ्या संख्येने गोळा होत असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा प्रभाव निश्चितपणे जाणवेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.