भोरः वीसगाव खोऱ्यातील नेरे येथील एका शेतकरी जनावरे घरी घेऊन जात असताना रस्त्याच्याकडेला प्लॅास्टिकच्या पिशवीवर म्हशीचा पाय पडल्याने मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत म्हैस जखमी झाली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमी म्हशीवर उपचार करण्यात येत आहे. सदर घटना सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
येथील शेतकरी शंकर रामचंद्र शिंदे हे डोंगर परिसरातून सायंकाळी जनावरे घरी घेऊन येत होते. त्यावेळी रस्त्याच्या शेजारी प्लास्टिकच्या पिशवीवर म्हशीचा पाय पडल्याने मोठा स्फोट होऊन शिंदे यांची म्हैस या घटनेत जखमी झाली. तत्काळ म्हशीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे नेहमीप्रमाणे डोंगर परिसरातील माळरानावर शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक म्हैस व शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. रानात चरून झाल्यावर सायंकाळच्या वेळी जनावरे घरी घेऊन येताना रस्त्याशेजारीच प्लास्टिक पिशवीत असलेल्या हातबॉम्बवर पुढे चाललेल्या म्हशीचा पाय पडला. यावेळी मोठा स्फोट झाला. या घटनेत शिंदे यांची म्हैस जखमी झाली. जखमी म्हशीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत.