पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिली. या तक्रारींपैकी ९९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने याप्रकरणी संबंधितावर कार्यवाही करण्यात आली आहे. तर उर्वरित ५७ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती देखील कावरे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲप जारी केले असून, या अॅपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये करण्यात आली आहे.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येणे शक्य झाले आहे. या अॅपमध्ये सर्वांत जास्त तक्रारी कसबा पेठ मतदार संघातून करण्यात आल्या आहेत. तर सर्वांत कमी पुरंदरमधून तक्रारी करण्यात आल्या आहेत.
सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी व कंसात कारवाई झालेल्या तक्रारी:
आंबेगाव विधानसभा-२६ (२५), बारामती-३३ (२८), भोर-५ (२), भोसरी-७६ (७३), चिंचवड-१८ (१७), दौंड-१० (८), हडपसर-४९ (४५), इंदापूर-३८ (३७), जुन्नर-३४ (३३), कसबापेठ-१६० (१५२), खडकवासला-२१ (१७), खेड आळंदी-३ (१), कोथरूड-६ (४), मावळ-१२ (११), पर्वती-१२५ (१२५), पिंपरी-१३ (११), पुण कॅन्टोन्मेंट-५८ (५६), पुरंदर-३ (१), शिरूर-२२ (९), शिवाजीनगर-४० (४०) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात – ३०२ (३०२) अशा एकूण १ हजार ५४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर तथ्य आढळलेल्या ९९७ तक्रारींवर कारवाई करण्यात आल्या आहेत.